हिंगोली - जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले होते. अखेर दोन दिवसांपासून सरपंच पदाचे आरक्षण सोडण्यास सुरुवात झाली. हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडले. मनाप्रमाणे आरक्षण सुटलेल्या गावातील सरपंच पदाचे दावेदार आनंदात न्हाऊन निघाले होते. मात्र सुटलेले आरक्षण तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आलेय. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या सरपंचाचा आनंद हा क्षणिक ठरला आहे. अनेकांचा हिरमोड झाला आहे.
गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सरपंचांचा आनंद ठरला क्षणिक हिंगोलीतील नगरपालिकेच्या कल्याण मंडप येथे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार अनिल माचेवाड यांच्या उपस्थित आज हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आली. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. दरम्यान, 111 गावतील ग्रामस्थ व सदस्य उपस्थित होते, उपस्थितांच्या स्वाक्षऱ्या देखील घेण्यात आल्या होत्या. मोजक्या ग्रामपंचायती वगळता, बऱ्याच ग्रामपंचायतींचे आरक्षण हे कायम राहिले होते. त्यामुळे सरपंचाचे दावेदार हे आनंदात न्हाऊन निघाले होते. मात्र काही वेळातच दिवसभरात काढलेले आरक्षण हे तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सुचवले.
निवडणूक विभागात पोर खेळ सुरू असल्याचा आरोपमोठ्या आशेने हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले होते. आरक्षण सोडत झाल्यानंतर त्या-त्या गावात ग्रामस्थही आनंदून गेले होते. काहींनी तर निवडणूक विभाग परिसरातच हारतुरे घालायला सुरुवात केली होती. मात्र काही वेळात हे आरक्षण रद्द झाल्याचे संदेश विविध व्हाट्सअप ग्रुप वर आल्यानंतर सर्वांचे डोळे हे चक्रावून गेले. त्यामुळे निवडणूक विभागात पोरखेळ सुरू आहे की काय ? असा सवाल विचारला जातोय.
उद्या होणार आरक्षण सोडतमतमोजणी झाल्यानंतर अकराव्या दिवशी सरपंच पदाचे आरक्षण सोडण्यात आले होते, मात्र तांत्रिक कारणामुळे 111 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत रद्द केली आहे. 30 जानेवारी रोजी हीच निवड परत होणार असल्याचे सांगितले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे उमेदवारासह मतदारांचा आरक्षण प्रकियेवरील विश्वास उडण्याची वेळ येत आहे.
तांत्रिक अडचण आहे तरी काय?आज सोडलेल्या आरक्षणामध्ये तांत्रिक अडचणीचे कारण समोर करून आरक्षण रद्द करण्यात आले आहे त्यामुळे आता ही तांत्रिक अडचण नेमकी आहे तरी कोणती आणि इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक विभाग काम करत असतानाही त्यांना तांत्रिक अडचण येते तरी कशी? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले आहेत.
हेही वाचा - 'हा तर फक्त ट्रेलर' इस्राईल दूतावासाबाहेरील स्फोटामागे इराण कनेक्शन