हिंगोली - शहरात कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढायला सुरूवात झाली आहे. वाढता रुग्णांचा आकडा बघता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 16 पथकांची स्थापना केली आहे. या कर्मचाऱ्यांना आज (रविवार) हिंगोली नगरपालिकेच्या कल्याण मंडपममध्ये जिल्हा आरोग्यधिकारी शिवाजी पवार यांनी प्रशिक्षण दिले. त्यामुळे आता पथकातील कर्मचारी कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यासाठी तपासणी मोहीम राबवणार आहेत.
हिंगोली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. वाढता रुग्णांचा आकडा बघता, रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे प्रशासन गतीने कामाला लागले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली शहरासाठी सोळा पथकांची स्थापना केलेली आहे. या प्रत्येक पथकात आशा वर्कर, एक तलाठी व दोन शिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषद विभागाचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत आज पथकामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
ही पथके हिंगोली शहरात आढळलेल्या कोरनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणार आहेत. सदरील व्यक्तीला तत्काळ विलगीकरण करणार आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस प्रशासनाच्यावतीने पथकासोबत आपला बंदोबस्त देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिल्या आहेत. तर त्या-त्या भागातील नगरसेवकांनी आपल्या भागात येणाऱ्या पथकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता ही पथके हिंगोली शहरातील कानाकोपऱ्यात फिरून कोरोनाची साखळी थांबवण्यासाठी कर्तव्य पार पडणार आहेत. यावेळी डॉ. देवेंद्र जायभाय, तहसीलदार गजानन शिंदे,डॉ. गोपाल कदम तालुका आरोग्य अधिकारी नामदेव कोरडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, उद्धव कदम आदींची उपस्थिती होती.