हिंगोली - राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात आज हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात 11 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे, हिंगोलीकरांना दिलासा मिळाला आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे हिंगोलीकर चांगलेच चिंतेत होते. मात्र, आरोग्य विभागाच्या यशस्वी उपचारानंतर रुग्ण बरे झाल्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 240 वर पोहोचली आहे. यातील 223 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या विविध कोरोना वार्डमध्ये एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दोन तर कळमनुरी येथील केअर सेंटरमध्ये तीन रुग्ण आणि कळमनुरीतीलच डेडि केअर कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये 3, लिंबाळा कुरला केअर सेंटर अंतर्गत 2, तर जिल्हा सामान्य रुग्णायातील कोरोना वार्डमध्ये एकूण 5 रुग्ण उपचार घेत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्यावतीने अनेक उपाययोजना करणयात आल्या आहेत. ज्या भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्या ठिकाणी कंटेंनमेंट झोन घोषित केले गेले आहेत. तसेच आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. सध्या जिल्ह्यातील 213 जणांचे अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.