हिंगोली - जिल्ह्यातील 11 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने हिंगोलीकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, आज जिल्ह्यात आठ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे, संबंधित परिसर प्रशासनाच्यावीने सील करण्यात आले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 248 वर पोहोचला आहे.
जिल्ह्यातील 223 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे, प्रशासनाकडून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व अधिकारी, डॉक्टर कर्मचारी, परिचारिका यांचे अभिनंदन केले आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमधील पाच रुग्ण हे कळमनुरी तालुक्यातील कवडा येथील रहिवासी आहेत. तर, दोन गुंडलवाडी आणि एक चंदगव्हाण येथील रहिवाशी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 248 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. तर, सद्य स्थितीत विविध कोरोना वार्डमध्ये 25 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.