हिंगोली - मुंबईवरून जिल्ह्यातील वसमत येथे सतरा लोक आले होते. त्यांना वसमत येथील शासकीय विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यापैकी आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. सध्या जिल्ह्यातील 15 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या नव्या रुग्णांमुळे आता हिंगोलीकरांची चिंता आणखी वाढली आहे. मात्र, आरोग्य प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. मुंबईवरून परतलेल्या या व्यक्तींमध्ये काही प्रमाणात लक्षणे आढळली होती. त्यामुळे, त्यांना होम क्वारंटाईन करण्याऐवजी शासकीय क्वारंटाईन करण्यात आले होते. सध्या हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 99 असून यातील 84 रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याने हिंगोलीकरांसह प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, आज पुन्हा नव्याने 8 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने, हिंगोलीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे. तर या कोरोनाबाधित रुग्णांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केले जात आहे.