हिंगोली- पाणी टंचाई ही मालसेलू येथील ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. मात्र,कसे बसे देखभाल दुरूस्तीच्या निधीतून अर्धवट का होईना नव्याने पाईप लाईन केली. पाणी ही नळाला येऊ लागले, मात्र तांत्रिक अडचणीने पुन्हा पाणी बंद होत आहे. गावात आमदार फंडातून पाणी फिल्टर उभारलेले आहे मात्र, आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करायचे आहे म्हणून ते बंद अवस्थेत ठेवले आहे. परिणामी ग्रामस्थाना उन्हा तान्हात पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
मालसेलू, खंडाळा, जयपूरवाडी या गावाला नेहमीच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. ग्रामस्थांना उन्हाळ्याची चाहूल लागताच, पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. मालसेलू येथे मात्र वडद येथील तलावावरून करण्यात आलेल्या पाईपलाईन मुळे दिलासा मिळालेला आहे. मात्र ती पाईप लाईन देखील अधुन मधून तांत्रिक अडचणीमुळे बंद पडत असल्याने, ग्रामस्थांच्या डोक्यावर हंडा कायम आहे.
विशेष म्हणजे मालसेलू येथील पिण्याच्या पाण्याचे स्रोत याही वर्षी कोरडे पडल्याने महिला व पुरुषांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ कायम आहे. ही भटकंती थांबवण्यासाठी रामराव वडकूते यांच्या आमदार फंडातून 7 लाख रुपयांच्या निधीतून मालसेलू येथे पाणी फिल्टर बसविण्यात आले आहे. काम ही पूर्णत्वास गेले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असल्याने, उदघाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. खर तर आता गरज आहे ती मालसेलूकराना पिण्याच्या पाण्याची. ग्रामपंचायत देखील या प्रकरणात अजिबात लक्ष घालायला तयार नसल्याने, ग्रामस्थाची मोठी दैना सुरू आहे.
कोरोनाच्या थैमानाने भांबावून गेलेले ग्रामस्थ पाण्याच्या संकटनाने हवालदिल झाले आहेत. त्यामुळे निदान या भीषण संकटात तरी उद्घाटनाचा सोपस्कार पार पाडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मालसेलू येथील ग्रामस्थांतून होत आहे. आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याशी संपर्क साधला असता लगेच गावात विचारुन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
खंडाळा अन जयपूरवाडी येथील देखील पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आमदार मुटकुळे प्रयत्न करतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कोरोनामुळे खायला तर मिळेना मात्र ढिसाळ नियोजनामुळे पिण्यासाठी पाणी जर मिळत नसेल तर याहून दुसरे दुर्दैव कोणते? अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.