हिंगोली- आज राज्यात कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील लसीकरनाचे ड्राय रन पार पडले. जिल्ह्याधिकारी रुचेश जयवंशी यांच्या देखरेखीखाली ड्राय रन झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात पार पडलेल्या या ड्राय रनसाठी 25 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय व डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्राची यासाठी निवड करण्यात आली होती. लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून, गुरुवारीच रात्री 25 लाभार्थ्यांना लसीकरणाचे संदेश पाठवण्यात आले होते. त्यानुसार लाभार्थी सकाळी 9 वाजता केंद्रावर पोहोचले. लाभार्थ्यांच्या आधार कार्डची तपासणी केल्यानंतर त्यांना केंद्रात सोडण्यात आले. लस दिल्यानंतर त्याना जवळपास अर्धातास निगराणी खाली ठेवण्यात आले होते.
ड्राय रन दरम्यान लसीकरण करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोनावर लस आल्याने दिलासा मिळाल्याचे त्यांनी म्हटले जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेश सूर्यवंशी, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ राहुल गीते, डॉ मंगेश टेहरे, डॉ गोपाल कदम यांच्यासह अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ड्राय रन मोहीम राबवण्यात आली.