हिंगोली - काळमान फार बदलत चाललाय. जून महिना संपण्याच्या मार्गावर असला तरीही अद्याप पर्यंत एकही पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरीनी अन कुपनलिकाने तळ गाठलाय. शेतकऱ्यांवर भयंकर असे पाणी टंचाईचे संकट निर्माण झालेय. जून महिना पूर्णतः कोरडा जाण्याची ही १९७२ नंतर पहिलीच वेळ असल्याचे एका ७० वर्षीय व्यक्तीने सांगितले. आताच विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ कायम असून, अजून काही दिवस पाऊस न पडल्यास भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे या शेतकऱ्यांने सांगितले.
कुंडलिक अंभोरे रा. सावरगाव असं या शेतकऱ्याचे नाव आहे. कुंडलिकराव हे ठेक्याने शेती करतात. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने, भांडवली खर्च देखील निघणे कठीण होऊन बसले आहे. तिन्ही वर्ष भीषण परिस्थितीत तर गेलेच तीन वर्षांची उणीव या हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा होती. मात्र जून महिना संपत आला असला तरी ही पाऊसच नसल्याने यंदा ही स्वप्नांवर पाणी फिरल्यागत झालंय.
स्वतःची पाच एकर शेती पडीक ठेऊन बारा एकर शेती ठोक्याने केलीय. इकडून तिकडून जुळवा करून मालकांचे पैसे दिलेत. तर उसनवारी करून खत बियाणांची व्यवस्था करणं सुरू असल्याचे शेतकरी कुंडलिकराव यांनी सांगितले. एवढे करूनही काही खर दिसत नाही. दिवसेंदिवस दिवस काळमान एवढा बदललाय तो एवढा बदलेल असे वाटलेच नव्हते. मागील वर्षी तरी आतापर्यंत खरिपाची पेरणी आटोपली होती अन पिके डवरणीला आले होते. आता तर पेरणी सोडाच पाण्यासाठी देखील वनवन भटकंती करावी लागत आहे. मकत्याने केलेल्या शेतात असलेली विहीर ही तळाला गेलीय. त्यामुळे विहीर उशाला अन कोरड घशाला अशी स्थिती झाल्याचे कुंडलीकराव यांनी सांगितले. पाणी नसल्याने लेकरा बाळांची, गुरा ढोरांची एवढी आबाळ होत आहे. ती पाहवत नाही, मात्र ईलाजही नाही.
आपण धडपड करून काही उपयोग होत नाही, मात्र राहवत ही नाही. गणपतराव म्हणतात, म्या उभ्या आयुष्यात असा भीषण दुष्काळ पहिला नाही. १९७२ नंतर पहिल्यांदाच ही भयंकर स्थिती निर्माण झाल्याचे गणपतराव कंठ दाटून सांगतात. शेती मालकाचे शेतात घर असल्याने, तरी आम्हाला आधार झालाय, उग घराच भाड भरण्यापेक्षा शेतात वास्तव्य करून आता दिवस ढकलत असल्याचे गणपतराव सांगतात. ही परिस्थिती या भागातील सर्वच शेतकऱ्यांची आहे. बऱ्याच शेतऱ्यांकऱ्याने ठोक्याने शेती केली आहे. ते देखील आप आपली कैफियत कंठ दाटून सांगत होते. पूर्वी पाऊस न पडल्यास देवाला साकडे घातले जायचे. गावात भजन कीर्तन कार्यक्रम घेऊन पाऊस पडण्यासाठी सगळा खटाटोप असायचा. परंतु आज पूर्वी सारखी परिस्थिती राहिलेली नाही. आज घडीला पाणी पडले काय अन नाही पडले काय याचे कुणालाही देणेघेणे नाही. उगाच आव आणला जातोय. मात्र बळीराजा आजही चिंतातुर आहे. पेरणीयोग्य पाऊस न पडल्यांने, शेतकरी, हवालदिल झाला आहे, चातका प्रमाणेच मेघराजाची आतुरतेने वाट पाहतोय.