हिंगोली - सेनगाव तालुक्यातील वाढवणा येथून कामावरून अचानक गायब झालेल्या तरुणाचा गावापासून जवळच असलेल्या विहिरीत मृतदेह आढळला. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात भावाच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शिवाजी परसराम तडस(२३), असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. शिवाजी याचा खून झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - मुलाना लांबवून अंगावरील सोने लुटणाऱ्या महिलेस अटक
शिवाजीचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. मात्र, घरची परिस्थिती बिकट असल्याने तो पुढे शिकू शकला नाही. मागील ३ वर्षांपासून तो शेतीमध्ये व मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. तसेच तो काही दिवसांपासून दारूच्याही आहारी गेला होता. शिवाजी हा 26 डिसेंबरला कामावर गेला होता आणि अचानक तो गायब झाला. त्याची रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी वाट पाहिली. मात्र, तो आला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवाजीचा शोध घेण्यास सुरुवात केली, तरीही तो कुठेही आढळून आला नाही. परिसरातील कपडसिंगी येथे यात्रा महोत्सव सुरू आहे. त्यामुळे तो तेथे गेला असावा असा अंदाज कुटुंबीयांनी लावला. तसेच त्याच्या मित्राकडे चौकशी केली. मात्र, तरीही शिवाजीचा शोध लागत नव्हता.
अखेर गावापासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या विहिरीवर काही नागरिक पाण्यासाठी गेले असता, त्यांना शिवाजीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. लगेच ही बाब शिवाजीच्या कुटुंबीयांना सांगितली. नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना दिली असता, सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबूराव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. मृतदेहाची दुर्गंधी पसरला होता. त्यामुळे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले होते. शिवजीच्या डाव्या डोळ्याखाली मोठी जखम आढळून आली होती. तसेच विहिरीच्या काही अंतरावर एक विळा आणि पेन आढळून आला आहे. त्यामुळे त्याचा खून झाला असल्याचा संशय शिवाजीचा भाऊ आत्माराम तडस यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.