हिंगोली- सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीने सर्वांचीच मने हेलावून सोडली आहेत. अंगावर शहारे उभे निर्माण करणारी परिस्थिती पाहून संपूर्ण महाराष्ट्रच हादरला आहे. अश्यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शनिवारी हिंगोली नगर पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य मार्गांवरून पूरग्रस्त मदत संकलन रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी साडेचार रोख, तर जीवन आवश्यक साहित्यांची व्यवस्था झाली. जमा झालेल्या वस्तुंना पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले आहे.
नगरकपालिकेच्या वतीने काढलेल्या पूरग्रस्त मदत संकलन रॅलीला हिंगोली वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील व्यापाऱ्यांनी गहू, तांदूळ, डाळ, कपडे, ड्रायफ्रूट, फळे, कपडे लत्ते, व प्रेमाने राख्या सुद्धा दिल्या. तसेच ब्रश, टूथपेस्ट, औषधी अशा सर्वच आवश्यक वस्तू पूरग्रस्तांसाठी दिल्या. संकलन रॅलीतून जमा झालेल्या सर्वच वस्तुंची नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक गणेश बांगर यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांनी साहित्याची जुळवाजुळव करून पॅकिंग केली. तसेच रोख निधी, धनादेश, आदी साहित्य पॅक केलेल्या बॉक्सवर नावे टाकत वाहनांमध्ये लोड केले.
हिंगोली कराने एवढी भरभरून मदत केली की, संकलन रॅलीत संकलित केलेले साहित्य टाकण्यासाठी दोन वाहने अपुरी पडली. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने वाहने वाढविण्याचा विचार केला जात होता. त्याचबरोबर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन दिलेच. मात्र, अजून मदत लागल्यास पूरग्रस्तांसाठी आम्ही सदैव तयार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्य, रिक्षा चालक, शालेय विद्यार्थ्यांनी देखील पूरग्रस्तांसाठी मदत केली. विशेष म्हणजे, शालेय विद्यार्थिंनींनी पुरामध्ये अडकलेल्या लाडक्या भावांसाठी राख्या देखील पाठवल्या. या राख्यांची पॅकींग करतांना नं.प कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.