हिंगोली- जिल्ह्यात चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने ओढा, नदी काठच्या शेतशीवारात पाणीच-पाणी झाले आहे. पेरलेले बियाणे, उगवलेले पीक या पावसाने वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबारच नव्हे तर तिसऱ्यांदा पेरणीची वेळ आली आहे.
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने, शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर उभ्या पिकात पाणी शिरल्याने, शेतकरी हतबल झाले आहेत. अगोदरच कोरोनाने भयभीत झालेला शेतकरी आता पावसामुळे देखील संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करणाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेत चकरा मारायला सुरुवात केली आहे. मात्र, बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अवघड झाले आहे.