हिंगोली - जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापयला सुरुवात झाली आहे. मतदान अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपले असले तरी युतीमधील अंतर्गत कुरबुरी काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे प्रचाराला गती देण्याऐवजी कुरबुरी कमी करण्यासाठीच उमेदवाराला वेळ द्यावा लागत आहे. अशाच प्रकारे भाजपच्या संपर्क कार्यालयात रुसवे फुगवे उघड झाले आहेत. त्यामुळे काही भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे युतीच्या उमेदवाराला अंतर्गत रुसवे-फुगवे दूर करत मतदारांना सामोरे जावे लागत आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आता आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. यामुळे आता कुठे प्रचाराला रंगत आली आहे. मात्र, निवडणूक आठ दिवसांवर येऊन ठेपली असली तरी महायुतीतील अंतर्गत रुसवे फुगवे काही केल्या कमी झाले नसल्याचे चित्र आहे. रोज काही तरी कुरबुरी सुरूच आहेत. विशेष म्हणजे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ वसमत विधानसभेत घेतलेल्या प्रचार सभेत खुद्द उमेदवारांसमोरच आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी आपणही रेसमध्ये असल्याचे सांगत विकास कामे केल्याची आकडेवारी सांगितली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयासमोर कोणी जाऊ शकत नाही. याची ही बरेच दिवस हिंगोली लोकसभा मतदारसंघात चर्चा रंगली होती.
आजच्या घडीला उमेदवारासह त्यांच्या पत्नीही जीवतोडून प्रचार करत आहेत. मात्र, हिंगोलीच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने, हेमंत पाटील यांची नांदेडच्याच कार्यकर्त्यांवर मदार असल्याचे दिसून येत आहे. मुख्य म्हणजे प्रचारात फिरण्यासाठी गाड्या देण्याच्या कारणावरूनच सर्वाधिक जास्त कुरबुर सुरू आहे.
दुसरीकडे रासपच्या कार्यकर्त्यांना जराही विचारले जात नसल्याचा आरोप रासपचे विनायक भिसे यांनी केला आहे. हिंगोली येथे ७ एप्रिल रोजी युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या पंकजा मुंढे यांच्या प्रचार सभेतूनही रासपच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. यामुळे महायुतीवर असलेली रासपची नाराजी स्पष्ट झाली आहे. दुसरीकडे मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांच्या सर्वाधिक जास्त सभा ग्रामीण भागात होत आहेत. त्यांचे नेटवर्क बऱ्यापैकी वाढलेले आहे. आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे हे अस्सल मराठीतून भाषण करत मतदारांना दंग करून टाकतात. त्यामुळे वानखेडेंचे ग्रामीण भागात नेटवर्क बरे दिसत आहे. मात्र, महायुतीच्या उमेदवारांची कार्यकर्त्यांच्या कुरबुरी सोडवत प्रत्येक गावात जाण्याची धडपड सुरू आहे. यामुळे मतदारही चांगलेच संभ्रमात असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकंदरीत तिन्ही उमेदवार जोरात कामाला लागल्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.