हिंगोली - राजकारणात आपला नेता येणार म्हटल्यांवर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो, ते वेळ-काळ, तहान भूख हरपून त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे अनेकदा पाहिले असेल. मात्र, क्षणभरात होणाऱ्या सत्कारासाठी कार्यकर्ते झोप बाजूला ठेवून सलग दोन दिवस नेत्याची वाट पाहत असल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे शनिवारी रात्री वसमत येथे आले होते. यावेळी त्यांनी आमदार राजू नवघरे यांच्या कॅबिनमध्येच कार्यकर्त्यांचे सत्कार स्वीकारले आणि काही वेळात मार्गस्थही झाले. मात्र ते येणार असल्याची माहिती मिळाली तेव्हापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली आहे. एवढेच नाही तर महिला कार्यकर्त्यांचाही यात समावेश होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसमत येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकव चव्हाण येणार होते. म्हणून, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी फार आतुर झालेले होते. दोन दिवसांपासून ते येणार म्हटल्याने, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. परभणीकडून येणाऱ्या मार्गावर, शुक्रवार पासून कार्यकर्ते हातात स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन रस्त्यावर तळ ठोकून होते. मात्र शुक्रवारी मंत्री चव्हाण आलेच नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा चेहरा हा पुष्पगुच्छ मधील फुलाप्रमाणे सुकुन गेला होता.
शुक्रवारची रात्र गेल्यानंतर शनिवारी परत त्याच उत्साहाने कार्यकर्ते स्वागतासाठी सज्ज झाले. जेव्हा दुसऱ्या दिवशी मंत्री चव्हाण आले, तेव्हा कुठे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी मंत्री चव्हाण यांनी आमदार राजू नवघरे यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागतही केले अन चव्हाणांनीही तेथेच सत्कार स्वीकारले आणि काही वेळातच मार्गस्थही झाले. दुसरीकडे मात्र काही कार्यकर्ते व काँगेस प्रेमी मंत्री चव्हाण यांच्याशी सवांद साधण्यासाठी खूप अतूर झाले होते. परंतु, चव्हाणांच्या ते लक्षातही आले नाही आणि सर्वांच्या आशेवर पाणी फिरले.
आल्या पावली परतले शेतकरी-
या वर्षी खरीप पेरणीच्या सुरुवातीपासून पावसाची रिप रिप सुरू असल्याने, पिकाची वाढ बऱ्यापैकी झाली होती. मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिराहून घेतल्याने शेतकरी हा हवालदिल झाला आहे. त्यामुळे वसमत येथे आलेले मंत्री चव्हाण काही तरी बोलतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र तसे काही ही झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला . तेवढ्या रात्री पण आल्या पावली शेतकरी परतले होते.