हिंगोली - जिल्ह्यात मागील ३ ते ४ वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेतकरी दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. अशा परिस्थितीत हिंगोली येथे होत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे परिस्थितीने नडलेल्या वधू-वर पित्यांना एक आधारच मिळाला आहे. या विवाह सोहळ्यासाठी अनेकजण मदतीसाठी राबत असून या सोहळ्यामुळे हळूहळू दानशूर पुढे येत असल्याचा प्रत्यय मागासलेल्या हिंगोली जिल्ह्यात येत आहे.
हिंगोली येथे मागील वर्षापासून 'हरी ओम कृषी सेवा भाविक संस्थे'च्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. पहिल्याच वर्षी आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात शंभरच्यावर वधू-वर विवाह बंधनात अडकणार होते. मात्र, पहिलेच वर्ष असल्याने हा आकडा वाढला नाही. त्यामुळे यावर्षी विवाह जोडप्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले नाही. मात्र, मागासलेल्या जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे खरोखरच वधू-वर पित्यांना एक प्रकारचा दिलासाच मिळाला आहे.
यंदा याठिकाणी वधू-वरांसाठी संसार उपयोगी साहित्य, मणी-मंगळसूत्र, जोडवे आणि कपडेरुपी आहेराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे सामुदायिक सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचा वीमा काढला जाणार आहे. त्यामुळे हा सामुदायिक विवाह सोहळा खरोखरच आगळा-वेगळा ठरला असून या सोहळ्याची जिल्हाभरात एकच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या विवाह सोहळ्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहून वधूवरांना शुभेच्छा देणार होते. मात्र, ऐनवेळी काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी फोनवरूनच वधूवरांना शुभेच्छा दिल्या. यावर्षीही तिच परिस्थिती राहणार आहे की काय? याकडे लक्ष लागले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना होत असलेल्या विवाह सोहळ्याला राजकीय मंडळी हजेरी लावणार हे मात्र निश्चित आहे.
दुष्काळ सदृश्य परिस्थितीत पार पडत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे मात्र, वधू पित्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले आहे. आजच्या महागाईच्या काळात वधू-वर पित्यांना विवाह करायचे म्हटले तर मोठे संकट दिसत आहे. मात्र, अशा परिस्थितीत होत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे खरोखरच दिलासा मिळाला आहे. तसेच दुष्काळसदृश्य परिस्थितीत यासारखे दानशूर पुढे आले, तर मुलगी पित्याला अजिबात जड वाटणार नाही. तर पिता नैराश्यापोटी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलणार नाही, हे मात्र तेवढेच सत्य. दरम्यान, आज पार पडत असलेल्या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी मंडळींची गर्दी झाली आहे.