हिंगोली- गोरेगावला अतिरिक्त तालुका म्हणून मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत घोषणा केली, तर बाळापूर येथे भेट दिल्यानंतर बाळापूरकरांनीही तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी केली. या मागणीचा विचार केला, जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने बाळापूरकर नाखुश झाले तर गोरेगावकर मात्र अतिरिक्त तालुक्याचा दर्जा दिल्याने खुश झाले. त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे फटाके फोडून स्वागत केले.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर या गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करण्यात येत आहे. जवळपास तीन वेळा केवळ पोकळ घोषणा देण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा दिली, ती देखील पोकळच असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
हेही वाचा - हिंगोलीत युवक काँग्रेस व काँग्रेस विद्यार्थी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
दुसरीकडे मात्र गोरेगाव या गावाला अतिरिक्त तालुका म्हणून घोषित केल्यामुळे त्या ठिकाणी आता सरकारी कार्यालय वाढविले जाणार आहेत. ही कार्यालये अतिरिक्त म्हणून काही काळापुरतेच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत उपस्थितांना संबोधित करताना सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने गोरेगावकर आनंदी झाले होते. त्यांनी महाजन आदेश यात्रेतून परत जाताच गोरेगाव येथे फटाके फोडून मुख्यमंत्र्याच्या घोषणेचे स्वागत केले.
हेही वाचा - हिंगोली : मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
बाळापूरकरांना यापूर्वी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच अशोकराव चव्हाण यांनीदेखील तालुक्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घोषणा केल्यामुळे हीच घोषणा तब्बल तिसऱ्यांदा बाळापूरकरांन ऐकावी लागली. ऐन पोळ्याच्या दिवशीच महाजनादेश यात्रा हिंगोलीत दाखल झाल्याने बऱ्याच गावातील पोळे विलंबाने फुटले.
हेही वाचा - 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा कारभार 'रामभरोसे'; बहुतांश डॉक्टर नशेत, हिंगोलीतील प्रकार