हिंगोली - विघ्नहर्ता चिंतामणी गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. या गणरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक हजेरी लावतात. या गणपतीच्या स्थापनेनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आज घोडेस्वार, भजनी मंडळ आणि विशेषत: यवतमाळच्या ढोल-ताशा पथकाने हिंगोलीकरांना भुरळ घातली.
आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागले होते. गणरायाच्या स्थापनेसाठी भक्तगण तसेच विविध गणेश मंडळ सक्रिय झाले होते. पोलिस प्रशासनानेदेखील गणेश मंडळांना वेळेत परवाना मिळावा यासाठी सहकार्य केले. परवान्यासाठी एका खिडकीची व्यवस्था केल्याने गणेश मंडळांना वेळेत परवाने मिळाले. शहरातील गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला स्थापना स्थळी पोहोचण्यासाठी मिरवणुका काढल्याचेही दिसून आले. जिल्ह्यातील हिंगोलीसह वसमत, कळमनुरी, सेनगाव, ओंढा नागनाथ या ठिकाणीही मिरवणूका काढून भक्तांनी बाप्पाचे स्वागत केल्याचे पहायला मिळाले.