हिंगोली - सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शासन सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. मात्र, मदत करुन उपकार तर केले जात नाहीत ना असा प्रश्न हिंगोलीतील गरिब जनतेला पडला आहे. रेशन लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या तूर डाळीमध्ये कीडे आढळले आहेत.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट घेऊन जीवन जगत असलेल्या अनेकांना जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत रेशन लाभार्थी उपाशी राहू नयेत म्हणून रेशन वाटप करण्याचे आदेश हिंगोली जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला दिले गेले. त्यानंतर लगेचच तालुकानिहाय रेशन दुकानदारांना वाटप केले. हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे दर्जाहीन तूरडाळीचे वाटप करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळून आले.
या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जनावरेही खाणार नाहीत असे धान्य वाटप करून, सरकार कोणते पुण्य पदरात पाडून घेत आहे? असा प्रश्न या नागरिकांनी केला.