हिंगोली : प्रचार्याला मारहाण प्रकरण आमदार संतोष बांगर यांच्या अंगलट आले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्याला कॅबिनमध्ये जाऊन संतोष बांगर यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवीगाळ करून मारहाण : मागील काही दिवसांपासून आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्ह्यांमध्ये चांगलीच दादागिरी वाढली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर ते त्यांच्या विधानाने देखील अनेकदा चर्चेत राहतात. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील महिला प्राचार्यांनी संतोष बांगर यांच्याकडे प्राचार्य उपाध्याय हे त्रास देत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार बागल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गाठले. प्राचार्याच्या कक्षामध्ये जाऊन प्राचार्याला शिवीगाळ करून मारहाण केली होती. संतोष बांगर यांचा तो व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावर प्रतिक्रिया देखील उलटच होत्या. अखेर आज त्या प्रकरणांमध्ये प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांच्या फिर्यादीवरून आमदार संतोष बांगरसह तीस ते चाळीस जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण : हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कार्यरत असलेल्या महिला प्राध्यापकांनी संतोष बांगर यांच्याकडे प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय हे मानसिक छळ करत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार 18 जानेवारी रोजी आमदार संतोष बांगर हे आपल्या कार्यकर्त्यांसह महाविद्यालयात पोहोचले होते. तेथे पोहोचल्यानंतर बांगल यांच्याकडे अनेकांनी तक्रारीचा पाढा वाचला. त्यानुसार संतोष बांगल यांनी प्राचार्य उपाध्याय यांच्या कक्षामध्ये जाऊन विचारपूस केली असता सुरुवातीला उपाध्याय आणि आमदार बांगर यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी थेट उपाध्याय यांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी शिवीगाळ देखील केली. दरम्यान, सीसीटीव्हीच्या डीपिआरचे वायर तोडून पाच हजाराचे नुकसान केले. शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी आमदार बांगरसह अन्य 30 ते 40 जनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.