हिंगोली - वसमत-परभणी रस्त्यावर एसटी बस उलटल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील 23 प्रवासी बचावले आहेत. तसेच बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी वसमतच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामंडळाच्या बसला अपघात होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.
माजलगाव आगाराची एम. एच. 20, बी. एल. 0638 क्रमांकाची बस नांदेडवरून वसमतमार्गे परभणीला निघाली होती. वसमतपासून काही अंतरावर बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस उलटली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बसचे नुकसान झाले आहे. बस उलटल्याने बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत.
हेही वाचा - VIDEO: नागपुरात जीप-ट्रकचा भीषण अपघात; मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद
परिसरातील ग्रामस्थांनी प्रवाशांना उपचारासाठी वसमत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हिंगोलीत आठवड्यापूर्वीच एका बसचा अपघात होऊन सात प्रवासी गंभीर जखमी झाले होते. महामंडळाच्या बसला अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.