हिंगोली - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत. राहुल यांच्या नेतृत्वातील या यात्रेने आज मंगळवार (दि. 15 नोव्हेंबर)रोजी 69 व्या दिवसात प्रवेश केला असून दिवसभरात हिंगोली येथून सुरुवात होऊन ती महाराष्ट्रातील विदर्भातील वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे. ( Bharat Jodo Yatra in Hingoli ) येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी झारखंडचे शूर शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, राहुल यांनी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बिरसा मुंडा यांच्या विचारधारेवर भाजपचा हल्ला - भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोलीत राहुल गांधी म्हणाले, बिरसा मुंडा यांच्या विचारधारेवर आरएसएस आणि भाजपकडून हल्ला केला जात आहे. आदिवासींचे नाव 'आदिवासी' वरून 'वनवासी' करण्यामागे भाजपची सखोल रणनीती आहे. राहुल गांधी म्हणाले, भाजपने आदिवासींचे अनेक हक्कही हिसकावले आहेत. जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, दलित, आदिवासी आणि गरिबांना हक्क मिळावा हे भाजपला मान्य नाही म्हणून ते संविधानावर रोज हल्ला करतात.
झारखंड १५ नोव्हेंबर रोजी स्थापना दिवस साजरा करत आहे - झारखंड 15 नोव्हेंबर रोजी धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती, स्थापना दिवस साजरा करत आहे. या दिवशी भगवान बिरसा यांचा जन्म खुंटी जिल्ह्यातील उलिहाटू गावात झाला. या दिवशी म्हणजेच १५ नोव्हेंबर २००० रोजी बिहारपासून वेगळे होऊन झारखंड स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. झारखंड स्थापना दिनी पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मस्थानी पोहोचून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
महाराष्ट्रामध्ये आठवा दिवस - भारत जोडो यात्रेत राहुल गांधी 150 दिवसांचा प्रवास करणार आहेत. कन्याकुमारीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 150 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये संपेल. यादरम्यान, राहुल गांधी ३५०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या यात्रेत राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रामध्ये आठवा दिवस आहे. कालपहाटे सहा वाजता हिंगोली शहरांमध्ये ही यात्रा दाखल झाली. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी परिसरातील गावातून अनेक नागरिक सहभागी झाले होते.