हिंगोली - किरकोळ कारणाने औंढा नागनाथ पोलीस ठाण्यावर जमावाने दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांना समजून सांगण्याचा पोलीस निरिक्षकांनी खूप प्रयत्न केला. मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एवढेच नव्हे तर जमावाने पीएसआय मुंजाजी वाघमारे यांना देखील मारहाण केली. शेवटी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी हवेत गोळीबार केला. तेव्हा कुठे जमाव शांत झाला अन् दगडफेक थांबली.
जमाव पांगवण्यासाठी पोलीस निरीक्षकांचा हवेत गोळीबार औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यावर नेमक्या कोणत्या कारणास्तव हल्ला केला हे अजून तरी कळू शकले नाही. मात्र 80 ते 100 जणांचा जमाव आल्यानंतर काही काळ पोलीस अधिकारी कर्मचारी गोंधळात पडले होते. जमाव पोलीस ठाण्यात आला अन् त्यांनी थेट आरडा ओरडा करीत पोलिस ठाण्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी जमावाला शांत करण्याचा अतोनात प्रयत्न केला मात्र जमावाची नागरिक हे पोलिस अधिकाऱ्यांच्या बोल याकडे अजिबात लक्ष देत नव्हते ते जास्तच दगडफेक करत होते. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने पोलीस निरीक्षक मुंडे यांनी थेट रिवाल्वर काढून हवेमध्ये गोळीबार केला तेव्हा कुठे जमावाने दगडफेक करणे थांबविले होते. दगडफेकीचे कारण अजूनही अज्ञात -
जमावाने कोणत्या कारणातून दगडफेक केलेली आहे हे अजून तरी कळू शकलेले नाही मात्र जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून जमावाचे दगडफेकीचे कारण तपासले जात आहे. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु हवेत गोळीबार केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.
पोलीस अधीक्षकांनी घेतली ठाण्यात धाव -
याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने मागविण्यात आले होते. पोलीस अधिक्षक राकेश कलासगर यांनी औंढा पोलिस ठाण्यात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.
आरोपीला अटक करण्यासाठी जमाव आल्याची दिली माहिती -
दोन दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल चोरी उघडकीस केली होती. यामध्ये औंढा नागनाथ येथील एका जणाचा मोबाईल होता. दरम्यान या व्यक्तीने मोबाईलसाठी या चोरट्यास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चोरट्याने त्या व्यक्तीला शिवीगाळ केली होती. त्यामुळे तात्काळ त्या चोरट्यास पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावे या मागणीसाठी जमाव जमा झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली आहे.