हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील पिंपळदरी शिवारात गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील देशी दारूच्या बाटल्या चोरट्या मार्गाने आणून त्यातील दारू काढत बनावट दारू बनवून विशिष्ट कंपनीची दारू असल्याचे भासवत दारूची विक्री केली जात होती. याबाबत गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ४५ हजारांच्या मुद्देमालासह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक उर्फ सावकार विश्वनाथ पोंपटवार रा. बाळापूर, गजानन दादाराव रिठे, शेख बुऱ्हाण शेख कासीम (दोघे रा. पिंपळदरी) अशी सदर आरोपींची नावे आहेत. सगळीकडे थर्टी फर्स्टची जोरदार तयारी सुरू असताना अशा प्रकारे भेसळ दारूचा प्रकार आणि त्यावर झालेल्या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सदर माहिप्रमाणे, आरोपींनी पिंपळदरी शिवारात शेख बुऱ्हाणच्या शेतात असलेल्या घरात गोवा राज्यातील विदेशी दारूच्या बाटल्या चोरट्या मार्गाने आणल्या. नंतर, त्यातील दारू कॅनमध्ये ओतून रिकाम्या बाटलीत भेसळ दारू भरून बाटलीवर बनावटी मॅकडॉन्लड नं १, इम्प्रेरीयल ब्ल्यू या कंपनीचे लेबल व झाकण बदलले जायचे. अन् हीच खरी दारू असल्याचे भासवत चोरट्या मार्गाने दारू विक्री केली जायची. याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला समजताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकला.
हेही वाचा - हिंगोलीत विद्यार्थ्यांनी सोलर फिल्टर चष्म्यातून पाहिले सूर्यग्रहण
या कारवाईत रिकाम्या दारूच्या बाटल्यांमध्ये ४५ हजार ९५० रुपये किंमतीची भेसळ दारू आणि ३०० विदेशी दारूच्या बॉटल्सही जप्त करण्यात आल्या आहेत. याठिकाणी बनावट दारू तयार करण्याचे साहित्य, पाणी, नवीन झाकण आढळून आले होते. हा कारखाना नेमका कधीपासून अन् कोणाच्या आशीर्वादाने चालवला जायचा याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच ही दारू कोणकोणत्या ठिकाणी पोहोचवली जायची, हे देखील पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे.
हेही वाचा - हिंगोलीत 'ऑपरेशन मुस्कान' : रस्त्यावर खेळ दाखवणाऱ्या मुलांना सुधारकेंद्रात पाठवले, पालकांचे केले समुपदेशन