हिंगोली - चाहते हे आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी केव्हा काय करतील याचा नेम नाही. अशाच एका युवकाने डॉ. अमोल कोल्हे हे लोकसभा निवडणुकीत निवडून यावेत म्हणून निवडणुकीपूर्वीच चप्पल वापरणे सोडले. ही बाब खुद्द डॉ. अमोल कोल्हे यांना समजतातच कोल्हे यांनी त्या कार्यकर्त्याला पुणे येथे बोलावून घेत, त्याचा सत्कार केला. त्यानंतर आपल्या पायातील चप्पल त्या कार्यकर्त्याला देऊन टाकली. एवढ्या तापत्या उन्हातही कोल्हे यांच्या प्रेमाखातर कार्यकर्त्यांनी चप्पल घातली नाही, त्यामुळे कोल्हेंनी त्याचा गौरव केला.
अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर धामणगाव येथील सदाशिव बेले यांनी जोपर्यंत कोल्हे खासदार होत नाहीत, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा ठाम निर्धार केला. विशेष म्हणजे एवढ्या वाढत्या भयंकर तापमानातही सदाशिवने जीवाची पर्वा न करता हा निर्धार कायम ठेवला होता. तर निकलानंतर कोल्हे यांचा विजय झाल्याचे कळताच धामणगाव येथे ग्रामस्थांनी जल्लोष साजरा करत सदाशिवचे देखील अभिनंदन केले. या विजयाचे काही क्षण कार्यकर्त्यांनी वाट्सअॅप, फेसबुकवर व्हायरल केले. हा प्रकार कोल्हे यांना कळताच त्यांनी सदाशिवला पुणे येथे भेटीसाठी बोलावले.
धामणगाव येथील सदाशिव बेलेसह दर्शन बेले या कार्यकर्त्यांनी पुणे येथे अमोल कोल्हे यांची भेट घेतली. कोल्हे यांनी सदाशिवचा गौरव करत स्वतःच्या पायातील कोल्हापुरी चप्पल काढून सदाशिवच्या पायात घातली. त्यानंतर पेढे भरवून कोल्हे यांनी सदाशिवचे आभार मानले. सदाशिव म्हणतोय, मला विश्वास होता, की कोल्हे हे खासदार होणार होतेच. त्यामुळेच मी हा कठोर निर्णय घेतला होता. वाढत्या तापमानाचा त्रास झाला होता. मात्र कोल्हे खासदार झाल्याने त्यांच्या आनंदाच्या भरात माझा त्रास कायमचा विसरून गेलो. आता अपेक्षा हीच आहे की त्यांच्या हातून चांगले कार्य घडो असेही त्याने यावेळी सांगितले.