हिंगोली - सर्वात अवघड निवडणूक जर कोणती असेल तर ती आहे ग्रामपंचायत निवडणूक. याचा अनुभव देखील अनेक गावांमध्ये आला आहे. मात्र, सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी या गावात बिनविरोध निवडून दिलेल्या उमेदवाराला सरपंच पदासाठी बहुमत सिद्ध करताना चांगलाच कडू अनुभव आला. संतप्त ग्रामस्थांनी महिला सदस्याला चोपून काढल्याने गावात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. गावात पोलिसांचे पथक दाखल झाले असून गावाला छावणीचे रूप प्राप्त झाले आहे.
काय आहे प्रकरण -
गावातील एक महिला इतर आठ सदस्यांसह निवडणुकीच्या रिंगणात उभी होती. मात्र, या महिलेला एका समाजातील मतदारांनी भरघोस पाठिंबा दिल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर राहिलेल्या आठ सदस्यांसाठी निवडणूक पार पडली. अतिशय शांततेच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र, निकाल लागलास तेव्हापासून, बिनविरोध निवडून दिलेल्या महिला सदस्य गायब होत्या. अचानक गायब झालेल्या या महिलेचा काही दिवसांपासून शोध घेतला जात होता. मात्र, नंतर ही महिला विरोधी पॅनल सोबत सहलीला गेल्याचे ग्रामस्थांना समजले.
सरपंच निवडीच्या दिवशी महिला सदस्य झाली हजर -
दोन्ही पॅनलचे चार-चार सदस्य निवडून आल्यामुळे सरपंच निवडीसाठी चांगलाच पेच निर्माण झाला होता. त्यामुळे बिनविरोध निवडून दिलेल्या सदस्यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे एका पॅनलने या महिला सदस्याला गायब केले होते. नेमके काय घडत आहे याची सदस्य महिलेला देखील जाण नव्हती. शेवटी सरपंच निवडीच्या दिवशी गायब झालेली सदस्य महिला गावात आली. सर्व प्रथम निवडून दिलेल्या मतदारांनी तिच्याकडे गायब असल्याचे कारण विचारले. मात्र, महिला उडवाउडवीची कारणे देऊ लागल्याने, मतदार महिला संतापल्या. त्यांनी सदस्य महिलेला मारहाण केली. या प्रकारामुळे गावात गोंधळ निर्माण झाला.
जखमी महिलेला हलविले उपचारासाठी -
मारहाण झाल्यानंतर महिलेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे गावात दंगा नियंत्रण पथक, पोलिसांची पथके दाखल झाले. परिणामी गावाला छावणीचे रूप आले होते.
सायंकाळी उशिरापर्यंत झाली निवड प्रकिया -
तणावग्रस्त वातावरणामुळे सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया ही सायंकाळी उशिरापर्यंत पार पडली. शेवटी महिला सदस्य सहलिला गेलेल्या पॅनलच्या प्रियंका रवी भगत यांना सरपंच तर दुसऱ्या पॅनलच्या प्रियंका विश्वास सोळंके या उपसरपंच झाल्या. अटीतटीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. ए. डबलवार यांनी काम पाहिले. यादरम्यान पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.