हिंगोली - ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील वीर माता रुखमाबाई भालेराव यांच्यावर हलाखीचे दिवस आल्याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित करताच वीर मातेला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड आणि दुसऱ्या दिवशी आमदार संतोष बांगर यांनी वीर मातेची भेट घेऊन त्यांना योग्य ती मदत दिली असून प्रशासनाने मातेला श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. शिवाय सुरू असलेल्या मदतीच्या ओघाने मातेच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनासारख्या महाभयंकर काळात पिंपळदरी येथील वीर माता रुखमाबाई भालेराव यांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. ही मन हेलावून टाकणारी बाब समाजसेवक बापूराव घोंगडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला कळवल्यानंतर 'ईटीव्ही भारत'ने त्यावर बातमी प्रकाशित केली होती. माध्यमातून बातमी प्रसिद्ध होताच मातेला मदतीचा ओघ सुरू झाला. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः वीर माता रुखमाबाई यांची भेट घेऊन त्यांना अन्नधान्य तसेच रोख रक्कम दिली, तसेच शासकीय योजनेचा लाभ देण्याचे अश्वासन दिले.
त्याचबरोबर, खासदार अॅड. राजीव सातव आणि जिल्हाधिकारी जयवंशी, तहसीलदार माचेवाड यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन वीर मातेला शासनाचे वृद्धापकाळाचे पेन्शन सुरू करण्यासाठी आज ऑनलाइन अर्ज भरून घेतला आहे. तसेच, आमदार संतोष बांगर यांनी देखील वीर मातेची भेट घेऊन त्यांना अन्नधान्य व आर्थिक मदत केली असून शासनाचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. कधी नव्हे ती अचानक होणारी मदत पाहून वीर माता अक्षरशः भारावून जात आहे.
जवान कवीचंद परसराम भालेराव यांना २००२मध्ये आले होते वीर मरण
सैन्यदलात असताना वीर मरण आलेले कवीचंद परसराम भालेराव यांच्या माता रुखमाबाई भालेराव या आपला दुसरा मुलगा प्रकाश भालेराव यांच्याकडे वास्तव्यास आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचा मुलगा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे अडकून पडला आहे, त्यामुळे वीर माता ही आपल्या नातीसह पिंपळदरी येथे वास्तव्यास आहे. घरी गुंठा भरही शेती नाही आणि राहायला घर नसल्याने मोठ्या हलाखीच्या परिस्थितीत वीर माता दिवस ढकलत होती. मात्र, आता प्रशासनाने दखल घेऊन स्वतः आयुक्त देखील मातेला मदत करणार असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. मदतीचा ओघ पाहून मातेच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
हेही वाचा- इतर जिल्ह्यात अडकून पडलेल्यांसाठी हिंगोली प्रशासन जाणार धावून, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश