हिंगोली- जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून अपघाताची मालिका काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. आज पुन्हा सेनगाव-रिसोड मार्गावर झालेल्या दुचाकी आणि बसच्या भीषण अपघातात एक तरुण गंभीर अवस्थेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला मदतीची गरज असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र त्याला मदत करण्याचे सोडून आसपासचे त्याचे चित्रीकरण करण्यात तल्लीन झाले होते, कारण येथे माणूसकी हरवली होती. हा विदारक क्षण खरोखरच हृदय पिळवटून टाकणारा होता.
रामकिसन नथूजी नायकवाल (वय. 45, रा. कारेगाव) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. नायकवाल हे दुचाकीवर जात होते. दरम्यान, सुलदली खु. फाट्यावर प्रवासी उतरवण्यासाठी उभ्या असलेल्या बसला पाठीमागून नायकवाल यांच्या दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये ही दुचाकी बसमध्ये जाऊन अडकली. तर नायकवाल यांचे डोके बसवर जोराने आदळले, आणि ते सिमेंटच्या रस्त्यावर गंभीर अवस्थेत कोसळले. बसमधील प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नायकवाल यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने सर्वच जण घाबरून गेले होते. जखमी नायकवाल यांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी, अनेक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नायकवाल यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते. यावरून, माणूसकी आटत चालली असल्याचा अनुभव याठिकाणी आला.
जमलेल्या लोकांपैकी काही रुग्णवाहिकेला फोन करीत होते. हा काळजाचे ठोके चुकवणारा क्षण माणुसकीबद्दल सर्व काही सांगून जात होता. हा अपघात एवढा भीषण होता, की यात नायकवाल यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. बसमध्येही जोरात आवाज झाल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, नायकवाल यांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकाने सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अजून तरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
हेही वाचा- हिंगोलीत पावसाची हजेरी; रोगराईला निमंत्रण मिळण्याची शक्यता