हिंगोली - नगरपालिकेतील कर्मचारी पत्ते कुटण्यात चांगलेच सराईत आहेत. मिळालेली संधी अजिबात वाया न जाऊ देता तिचे सोन करणारे कर्मचारी सर्वाधिक जास्त असल्याने, अशा कर्मचाऱ्यांच्या पत्ते कुटण्याने नगरपालिका मात्र चांगलीच चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी काम बंद आंदोलनादरम्यानही सफाई कामगारांनी पत्ते कुटल्याने त्यांच्यावर पालिकेच्यावतीने सीओ रामदास पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली होती. याचा विसर पडतो न पडतो तोच पुन्हा पालिकेच्या अग्निशमन दल परिसरात जुगार खेळताना पोलिसांच्या छाप्यात कर्मचारी अडकलेत.
सीओ रामदास पाटील यांनी ६ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन तर, ८ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नगर पालिकेचे कर्मचारी नेहमीच पत्त्याच्या डावात तल्लीन राहत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी पालिकेच्या अग्निशमन दल परिसरात छापा मारला. पालिकेच्या अग्निशमन दल परिसरात जुगार खेळताना पोलिसांच्या छाप्यात कर्मचारी अडकले.
लिपिक गजानन नारायण बांगर, शिपाई मनोहर श्यामसुंदर कीर्तनकार, सुनील नागोराव लोखंडे, सत्यनारायण सुरजमल जैस्वाल, मुकादम शाहेद खा जनिमिया पठाण खा, सफाई कामगार अनिल गालफडे या सर्वांना निलंबित केले आहे. तर बंडू बापूराव हटकर, रघुनाथ लिंबाजी बांगर, संदीप दत्तराव कांबळे, नितीन बाळू पवार, दिलीप रंगनाथ दोडके, संजय गोपाल ननावरे, दिलीप लिंबाजी थिटे, माधव नरहरी सुकते यांना व अग्निशमन दलाच्याही काही ८ जणांना कर्तव्यावर हजर न राहणे, फोन बंद करून दांडी मरणे व कामाशिवाय इतरत्र फिरणे अश्या नोटीसा बजावल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी काम बंद आंदोलनादरम्यान सफाई कामगारांनी पत्ते कुटल्याने त्यांच्यावर ही सीओ रामदास पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली होती.