हिंगोली- शहरात आतापर्यंत रात्री-अपरात्री चोऱ्या झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. मात्र, आता पहिल्यांदाच दिवसाढवळ्या पाच घरी चोरट्यांनी हात साफ करून शहर आणि ग्रामीण पोलिसांना आव्हानच केले आहे. तसेच दिवसा चोरीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर दुचाकीवरून जाणारे चोरटे काही जनांनी पहिल्यामुळे आणि जिल्ह्यात नाकाबंदी केल्याने वेळीच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सांगितले.
हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या बळसोंड भागातील रामकृष्ण कॉलनी येथील शिक्षक कॉलनीतील जनार्दन नाईक, अशोक वाणी, जनार्धन धायगुडे तर जिजामाता नगर परिसरात नारायण वैद्य, सोळंके यांच्या घरी चोरट्याने दिवसा ढवळ्या डल्ला टाकला. यामध्ये ५ लाखाच्या वर सोने-चांदी आणि मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. मात्र, चोरी करून तातडीने दरवाजा उघडून दुचाकीवर बसलेले चोरटे शेजाऱ्यांच्या नजरेस पडले. चोरट्यांनी शाईन मोटरसायकल वापरली असून वाहणाच्या पाठीमाघे सरकार असे नाव लिहिलेले होते. तसेच दुचाकीवरील दोघेही तरुण वयाचे असल्याचे एका महिलेने सांगितले. महिला सांगत असलेल्या वर्णनावरून ग्रामीण व शहर पोलिसांकडून चोरट्यांचा तपास केला जात आहे.
तर घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही चेक केले जात आहेत. एवढेच नव्हे तर, जिल्ह्यामध्ये सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली असून, पोलीस यंत्रणाही चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सतर्क झाली आहे. लहानसान हालचालींवर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहे. शाईन कंपनीच्या आणि त्यामागे सरकार लिहून असलेल्या गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. एवढेच नव्हे तर, पोलिसांना चोरट्यांच्या दुचाकीचे नंबरही मिळाले आहेत. त्यामुळे वेळीच चोरट्यांना बेड्या ठोकल्या जातील, असे अप्पर पोलीस अधीक्षक काळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे. मात्र, अनोळखी व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका. तसेच कुणावर संशय वाटला तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान हिगोली पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा- माझ्या मुलां-बाळांना जगवायचं कसं? पिकाचं नुकसान पाहून शेतकऱ्याने आईजवळ व्यक्त केली शेवटची खंत..