हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार घेत असलेल्यांपैकी 17 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. यामध्ये 16 राज्य राखीव दलाचे जवान आणि अन्य एकाचा समावेश आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव दलातील जवान मालेगाव आणि मुंबई येथे बंदोबस्त आटोपून आल्यानंतर त्यांच्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. एवढेच नव्हे तर जवान उपचारासाठी प्रतिसाद देत नसून रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्या आरोपांचे या जवानाकडून खंडनदेखील करण्यात आले होते. मात्र, आज त्यांपैकी काही कोरोनामुक्त झाले असल्याने राज्य राखीव दलासह हिंगोलीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यांमुळे हिंगोली जिल्हा शतक पूर्ण करते की काय अशी सर्वांना चिंता लागली होती. मात्र, हळूहळू वजाबाकी सुरू झाली अन् आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे कोरोनाबाधित रुग्ण हे बरे होत गेले. चार जवानांनंतर आता तब्बल 17 रुग्ण एकत्रितपणे बरे झालेले आहेत. सर्व बरे झालेल्या रुग्णांना आज आनंदाने टाळ्यांच्या गजरात जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले आहे. तसेच तीन दिवसांपासून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालात कमी रुग्णसंख्या असल्याने अन् आता 17 रुग्ण एकदम बरे झाल्यामुळे प्रशासनासह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.