हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. हिंगोली शहरातील आझम कॉलनी अन मंगळवारा भागातील दोघांचा कोरोनांने मृत्यू झाला. तर जिल्ह्यात 12 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच कोरोनाचे मृत्यू, ही देखील जिल्हावासियांसाठी चिंतेची बाब बनली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर राजस्थानमधून हिंगोली येथे दाखल झालेल्या रिसाला बाजार भागातील 20 अन 27 वर्षाच्या पुरुषांना कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच पुणे येथून आलेल्या गायत्री नगरातील 22 वर्षीय युवकाचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर मुंबई येथुन परतलेल्या मस्तानशहा परिसरातील 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - एकदिवसीय उच्चांक! राज्यात तब्बल १० हजार ५७६ कोरोना रुग्णांची नोंद, २८० मृत्यू
बीड येथून हिंगोलीत आलेल्या तलाबकट्टा परिसरातील 45 वर्षीय व्यक्तीचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. वसमत तालुक्यातील पारडी येथील दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून, संबंधित महिला अन पुरुष कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत.
शिवाजी नगरातील दोघांना ताप सर्दी खोकल्याचा आजार असल्याने त्याना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचेही दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे मुंबई येथून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे. एकंदरीत आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 452 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 327 रुग्ण हे बरे झाले आहेत. तर, सध्या 120 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.