पणजी - माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या चिरंजीवांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. मात्र, पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांनी आपण अद्याप असा कोणताही विचार केलेला नसून आपण लोकभावना समजून घेत असल्याचे सांगितले.
१७ मार्चला मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले. त्यामुळे गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तत्पूर्वी मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पणजीसाठी अजून अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील पोटनिवडणूक होण्यास बराच कालावधी बाकी आहे.
शुक्रवारी भाजपचे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी पणजीतील महालक्ष्मी मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत उत्पल पर्रीकरही होते. यावेळी त्यांना पणजी पोटनिवडणुकीत उभे राहणार का ? असे विचारले असता ते म्हणाले, लोकांच्या भावना मी समजून घेत आहे. मात्र, निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघता येईल. पक्षाचे काम आधीपासूनच करतोय आणि श्रीपाद नाईक जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करतात तेव्हा पूर्वीही येत असे. दरम्यान, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी सांत्वनपर भेट दिली तेव्हा मनोहर पर्रीकर यांच्या मुलांनी राजकारणात येत त्यांचा वारसा पुढे न्यावा, असे म्हटले होते.