पणजी - भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयातर्फे आयोजीत' आदी महोत्सव' शनिवारपासून दर्यासंगम-कला अकादमीत सुरू झाला. आदिवासी समुदायातील लोकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच थेट ग्राहकांशी संपर्क घडवून आणण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
याविषयी माहिती देताना ट्रायफेडच्या विपणन विभागाचे प्रमुख अमित भट्टाचार्य म्हणाले की, आदिवासींच्या उत्पादित मालाला बाजरपेठ मिळवून देणे, त्यांचा थेट ग्राहकांशी संपर्क घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशाच्या विविध प्रदेशातील आदिवासी आपल्या उत्पादित मालासह सहभागी झाले आहेत. त्यांना सरकारतर्फे येण्याजाण्यासाठी खर्च आणि उत्पादनाला किमान आधारभूत किंमत दिली जाते. २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षातील हे ११ वे तथा शेवटचे प्रदर्शन आहे.
या निमित्ताने दररोज संध्याकाळी आदिवासींच्या सांस्कृतिक ठेव्याचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रदर्शनात आदिवासींचे दागदागिने, धातूच्या वस्तू, कपडे, सुगंधी द्रव्ये आणि कलाकृती प्रदर्शनासाठी तसेच विक्रीसाठीही उपलब्ध आहेत.
रविवारी आदिवासी फॅशन शो
आदिवासी वापरत असलेले कपडे आणि दागिने घालून रविवारी ( दि. १७ ) संध्याकाळी होणाऱ्या फॅशन शोमध्ये सहभागी होणार आहेत. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच शो असेल.