गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे पुढील खबरदारीचे उपाययोजना करण्यासाठी व इमारतीच्या निर्जंतुकीकरणासाठी येत्या सोमवारपर्यंत जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालये अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले यांनी काढले आहेत.
शासन निर्णयाप्रमाणे 15 टक्के कर्मचारी हे कार्यालयात कामावर असायला हवे होते. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेतील सर्वच विभागातील हजेरी बघितल्यास ती 100 टक्के होती. त्यातच जिल्ह्यातील नागरिकांसह येणार्यांची संख्याही अधिक होती. त्यातच जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीमधील कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळल्याने अधिकांना तो संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचे (आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकारी वगळून) इतर सर्व कार्यालय बंद करण्यात आले आहेत. सोबतच दरदिवशी कार्यालय निर्जतुंकीकरणासाठी एक कर्मचारी व परिचर नेमण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
पाॅझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या पंचायत व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी यांची तपासणीही करण्यात येणार आहे. तर रुग्ण आढळल्यानंतर आज पहिल्यांदाच जिल्हा परिषदेतील इमारत व कार्यालये सॅनिटाईझ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या आगोदर पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. तसेच जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव, देवरी, सालेकसा व नवेगावबांध पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून अधिकारी क्वारंटाईन झाले आहेत.
आता जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. सदर कर्मचारी हा आपल्या विभागप्रमुखासह जिल्हा परिषदेच्या वाहनाने चार ते पाच दिवस आधी नागपूरला विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. सदर कर्मचार्याला बरे वाटत नसल्याने तपासणी केली असता सोमवारच्या रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागपूरला गेलेल्या सर्वांची तपासणी केली जात आहे.