गोंदिया - शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव गावात ही घटना घडली. या महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
डिलेश्वरी बघेले असे मृत महिलेचे नाव असून त्या गावात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे अंगणवाडीतील कामे उरकून आजही सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्या शेतात मोहफुले वेचण्यासाठी गेल्या. मात्र, सायंकाळी ७ वाजले असताना त्या घरी पोहोचल्या नसल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी शेतातील मोहफुलाच्या झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ 'मैं भी नही बचुँगा, मैंने जहर खा लिया है' असे लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामुळे अज्ञात आरोपीने त्यांची हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गोरेगाव पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.