गोंदिया - कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाड्यांना स्मार्ट करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. मात्र, गोंदियातील अंगणवाड्यांची स्थिती बघून खंत वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात त्यांची पत्रकार परिषद होती. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. कादबंरी बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खेवले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदियातील अंगणवाड्यांची स्थिती वाईट असून या अंगणवाड्यांना स्मार्ट व हायटेक करण्यासाठी स्वंयसेवी संस्थेची मदत अद्याप घेण्यात आलेली नाहीय.
मात्र यापुढे जिल्ह्यातील मोठ्या उद्योग समुहाचा सीएसआर निधीचा वापर अंगणवाड्यांना स्मार्ट करण्यासाठी वापरावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच अंगणवाडी सेविकांना स्मार्ट करत अद्ययावत पद्धतीने प्रशिक्षण देऊन मुलांनाही खासगी इंग्लिश कॉनव्हेंटसारखे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला बालविकास विभागामार्फेत माविमचे काम गोंदिया जिल्ह्यात चांगले सुरू असून वनटाईम सेटलमेंट मध्ये काही अडचणी आहेत, असे ठाकूर म्हणाल्या. एलआयसीसोबत लवकरच हे प्रकरण निकाली काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोवीड-19 काळात गुन्ह्याचे प्रमाण कमी वाटत असले तरी महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, त्याचा तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे.आदिवासी भागातील महिला व शाळेतील मुलींवर विशेष लक्ष दिले जाणार असून त्या भागात महिला शोषणाचे प्रमाण अधिक असल्याने काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे कुपोषण रोखण्यासाठी पोषण आहाराचा पुरवठा नियमित केला जात असून अमृत आहार योजनेंतर्गतही लवकरच निधी उपलब्ध करणार असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.
कोवीड-19 अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना एकाच वार्डात ठेवले जात असल्याने रुग्णांवर जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. संबंधित बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी रुग्णांसाठी सर्व सोयी उपलब्ध करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.