गोंदिया - भव्य आयुष्मान भारत 'आरोग्य वर्धिनी केंद्र' हे गोंदिया तालुक्यातील खमारी येथे ५ कोटी रुपयातून तयार करण्यात आलेले आहे. या इमारतीचे लोकार्पण राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व गोंदियाचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीसाठी काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पाठपुरावा करत दीड वर्षात हे केंद्र उभे केले. तसेच आजच्या या लोकार्पण सोहळ्या दरम्यान काँग्रेसच्या मंचावर भाजपचे दोन मंत्री आल्याने चर्चेला ऊत आलेला आहे.
काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने ही आरोग्य वर्धिनी केंद्र इमारत तयार करण्यात आली होती. दीड वर्षाआधी विखे-पाटील विरोधी पक्षनेते असताना या इमारतीचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. विखे हे अग्रवाल यांचे जवळेच मानले जातात. त्यामुळे या इमारतीचा लोकार्पणही विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र, विखे हे भाजपमध्ये गृहनिर्माण मंत्री पदावर असून ते आज काँग्रेसच्या मंचावर आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. हा कार्यक्रम म्हणजे काँग्रेस आमदार हे भाजपात जाण्याची तयारी तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज?
भाजपमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रवेश करीत आहे. तसेच गोपालदास अग्रवाल हे विखे यांच्या जवळील असल्याने आमदार अग्रवालही भाजपात येतील असे बोलले जात आहे. या सोहळ्यात विखेंनीही आमदार अग्रवाल यांना भाजपात येण्याचे सुचवले आहे. आमदार गोपालदास अग्रवाल हे मागील २५ वर्षांपासून काँग्रेसचे आमदार असुन दोनदा विधानपरिषद सदस्य राहिलेले आहेत. तसेच ३ वेळा गोंदिया विधानसभा येथील काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. तसेच मागील पाच वर्षांपासून ते महाराष्ट्राच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षही आहेत. तसेच विखे-पाटील यांच्या अत्यंत जवळीचे असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे गोपालदास अग्रवाल यांची पुढची भूमिका काय असेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस,राष्ट्रवादी बाजी मारेल - प्रफुल्ल पटेल