पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला धानाचे कोठार असे संबोधले जाते. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने धान पिकांच्या रोवण्यादेखील शेतकऱ्यांनी उशिरा केल्या होत्या. त्याचप्रमाणे कापणी आणि मळणीदेखील उशिरा करण्यात येत आहे. सध्या काही प्रमाणात पिकांच्या कापण्या सुरु आहेत. तर काही शेतकऱ्याच्या मळण्या सुरु आहेत. मात्र, आजच्या या अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट आले.
कोरोनामुळे शेतकरी आधीच संकटात -
पूर्व विदर्भात धानपिकाची सर्वात जास्त लागवड ही गोंदिया जिल्ह्यात केली जाते. या वर्षी कोरोनामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला होता. त्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता मावा, तुडतुडा रोगामुळे थोडेफार हाथी येणारे पीकही नष्ट झाले आहे. पेरणी, रोवणी, खते, बियाणे याला एकरी २० हजार रुपये खर्च येतो. मात्र, पीक नष्ट झाल्याने हा खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. तसेच, जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.