गोंदिया - गरीब जनतेला वेळेवर आरोग्य सेवा मिळावी आणि उपचार मिळावे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा प्रधानमंत्री जन स्वास्थ्य योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री जनस्वास्थ्य योजनेची सुरुवात २३ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आली. २०११ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेनुसार, दारिद्र्य रेषेखालील लोकांना लाभ देण्यात यावा, याकडे भर दिला आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सहपरिवार शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
या निमित्त १२ डिसेंबरला गोंदिया येथील कुडावा ग्रामपंचायत येथे 'युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे' घेण्यात आला. यामध्ये ३०० महिला, पुरुष व बालकांची हेल्थ तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना काही रोग असल्यास कार्ड तयार करून पुढच्या उपचारासाठी गोंदिया येथील ४ रुग्णालयात त्यांचा उपचार निशुल्क होणार असल्याचेही माहिती येथील नागरिकांना या महाआरोग्य शिबिराद्वारे देण्यात आली.
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ९८५ लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच आजपर्यंत या योजनेदरम्यान १ लाख ७८ हजार लोकांचे कार्ड तयार करण्यात आले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन स्वास्थ्य योजनेत ९७१ आणि नवीन ३२९ अशा १ हजार ३०० रोगांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार उपलब्ध केले जातात. ज्या कुटुंबांना प्रधानमंत्री यांच्यातर्फे पत्र पाठवण्यात आली आहेत, त्यांना गोल्डन कार्ड शासकीय रुग्णालय केटीएस, बीजीडब्ल्यू हॉस्पिटलमधून विनामूल्य बनवले जाते. बाहेकर व न्यू गोंदिया रुग्णालयांकडूनही निशुल्क कार्ड तयार केले जाऊ शकते. यासाठी आज पुन्हा जिल्ह्यामध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) च्या माध्यमातून लोक आपले कार्ड बनवू शकतात.