गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या ओवारा गावाने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ओवारा गावचे सरपंच व उपसरपंच यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलांना एक दिवसाचा सरपंच व उपसरपंच पदाचा पदभार देण्यात आला. तसेच शाळेतीलच काही मुलांना सदस्य बनवण्यात आले.
देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायतीमध्ये खूप वेळा ग्रामसभा घेण्यात येतात. पण ग्रामस्थ या सभेला हजेरी लावत नाहीत. त्यामुळे गावाच्या समस्यांवर उपाययोजना करता येत नाहीत. ओवारा ग्राम पंचायतच्या उपसरपंच कमल येरणे यांनी एक दिवसाचा सरपंच ही संकल्पना मांडली.
ही कल्पना कमल येरणे यांना नायक चित्रपट बघून उमगली. त्यांनी ही कल्पना आपल्या सरपंच व सदस्यांपुढे मांडली व त्याला सर्वांनी एक मताने सहमती दर्शवली. त्यानंतर एक दिवसाचा सरपंच निवडण्याकरता शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने व पन्नास टक्के महिला आरक्षण देत निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीतून सरपंच, उपसरपंच व सदस्य निवडण्यात आले. निवड झालेल्या नितेश कोरोते, (एक दिवसाचा सरपंच) साक्षी बिसेन, (एक दिवसाची उप सरपंच) यांना एक दिवसाचा पदभारही देण्यात आला.
यामुळे गावातील लोक ग्रामसभेला येतील व त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळू शकेल. या संकल्पनेतून गावचा विकास साधता येऊ शकतो, अशी आशा ग्रामपंचायतीला आहे.