गोंदिया- जिल्हापरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराजवळ १२०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंत्राटदाराने केलेल्या ३ लाख रुपयांच्या कामांचा धनादेश देण्यासाठी ही मागणी करण्यात आली. दरम्यान, लाचलुचपत विभागाने या दोन्ही महिलांना रंगेहात अटक केली आहे.
सन २०१७-१८ च्या आर्थिक वर्षात मोजा झिटाबोडी येथील सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले होते. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर विहित मुदतीत काम पूर्ण करून त्याबाबतचे ३ लाख रुपयांचे बील जिल्हा परिषदेच्या सार्वजनीक बांधकाम विभागात जमा करण्यात आले. मात्र काहीच कारवाई न झाल्यानं कंत्राटदारानी विभागात चौकशी केली. यावेळी विभागात कार्यरत परिचर रवींद्रा लांजेवार यांनी त्यांच्याकडे १२०० रुपये लाचेची मागणी करत काम करण्याचं आश्वासन दिले. कंत्राटदाराने लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार केली. यावरून सापळा रचत रेखा राऊत (४५,वरिष्ठ सहायक) व रवींद्रा लांजेवार (४६, परिचर) यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.