गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या तिगावनजीक भरधाव वेगाने जात असलेल्या एसटीने दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती कि, यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. गोंदिया आगाराची एम एच ०६ एस ८८५२ ही गोंदिया-तिल्ली मार्गावर धावणारी एसटी बस आज दुपारच्या सुमारास जात होती. याचवेळी दुचाकी क्र. एमएच ३५, ए एम ०७५० क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी चालक विलास मडावी (रा. मंगेझरी) या तरूणाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. यापूर्वी देखील याच परिसरात एसटीने अंगणवाडी सेविकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ वाहनाला धडक दिली होती. यात अंगणवाडी कर्मचारी जखमी झाल्या होत्या.
मृत विलास मडावी हा आपल्या दुचाकी ने साखरी टोलावरून ठाणा मार्गे गोंदिया कडे जात असतांना जांभुळटोला चौकात विरूध्द दिशेने येणाऱ्या एस.टी बस ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात विशाल मडावी यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी घटनास्थळी पोहचुन भ्रमणध्वनीने आमगाव पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृत देह शवविच्छेदना साठी ग्रामीण रूग्णालय आमगाव येथे पाठवला. बसचालकाचे नाव जितेंद्र किशोर भरणे (रा. गोंदिया) असे असून त्यांच्यावर आमगाव पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.