गोंदिया- अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी हप्ता मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.एका हॉटेल व्यावसायिकाकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी पकडले.
तक्रारदार एका हॉटेलचा व्यवसाय करतो. तो अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाल्याने २ जुलै रोजी हॉटेलची तपासणी करण्यासाठी सपोनि प्रशांत पवार इतर कर्मचाऱ्यासह गेले होते. त्यावेळी हॉटेलची झडती घेण्यात आली मात्र दारु आढळली नाही. हॉटेल वॉल कम्पाऊंडच्या बाहेर दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. यावरुन त्यांनी तक्रारदारास, अवैध दारू विक्रीचा धंदा सुरु आहे. म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी कारवाई करतो असे सांगितले. पोलीस कर्मचारी शरद चव्हाण याला तक्रारादकडे पाठवले.
चव्हाण यांनी तक्रारदाराकडे कारवाई न करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे नाही असे सांगितले. यावर चव्हाण यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. तसेच यापुढे धंदा सुरू ठेवायचा असेल तर साहेबांना १० हजार रुपये मासिक हप्ता द्यावा लागेल,असे सांगितले.
तक्रारदाराने नाईलाजाने त्यांच्या जवळील ८ हजार रूपये शरद चव्हाण यांच्याकडे दिले. उर्वरित रक्कम २ हजार रूपये नंतर देतो असे म्हटले. मागणी केलेले २ हजार रुपये व मासिक हप्ता म्हणुन १० हजार रूपये असे एकूण १२ हजार रूपये देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदवली.
लाचलुचपात विभागाने सापळा रचत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मुकुंद पवार व पोलीस शिपाई शरद प्रकाश चव्हाण या दोघांना अवैध दारू विक्री व्यवसाय प्रकरणी कायदेशीर कारवाई न करण्याकरता तक्रारदाराकडून ४ हजार रूपये लाच स्वीकारताना अटक केली. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांच्याविरूध्द कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.