गोंदिया - कृष्ण जन्माष्टमीला कृष्णा विराजमान झाले असून श्री कृष्णाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. याच विसर्जन सोहळ्यादरम्यान गोंदिया तालुक्यातील गंगाझरी गावच्या खोड्या तलावामध्ये बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजता घडली.
देवदास उरकुडा उईके (60 वर्ष), तर रजनीश प्रदीप वानखेडे (26 वर्षां रा. गुलाबटोल गांगझरी) अशी दोघा मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही गुरुवारी सायंकाळी श्रीकृष्ण मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी खोड्या तलाव येथे गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा ही बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनाही सूचित केले. घटनास्थळी ग्रामस्थांनी या दोघांची शोध मोहीम हाती घेतली. गावातील ढीवर यांच्या साहाय्याने तलावात बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यात काही तासानंतर यश आले. पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून 2 दिवस आधीच विसर्जनावेळी दक्षता घेण्याच्या सूचना करत नदी तलाव याठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली होती. यासह, कन्हैया विसर्जन घरीच करावे, असे ही आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाकडे दुर्लक्ष करणे दोघांच्या जीवावर बेतले आहे.