गोंदिया - चंद्रपूर रेल्वेमार्गावर गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रेनच्या धडकेत दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिंडकेपार-हिरडामाली रेल्वे मार्गावर घडली. या अगोदर देखील ३ रानडुक्कर व ६ गायींचा याच रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
गोंदिया-चंद्रपूर हा रेल्वे मार्ग नागझिरा अभयारण्यातून जातो. हिरडामाली ते गोंगली रेल्वे स्थानकापर्यंत दाट जंगल परिसर असल्याने अनेकदा जंगली प्राणी जंगलातून या रेल्वे लाईनच्या दुतर्फा ये-जा करत असतात. त्यामुळे ट्रेनच्या धडकेत अनेकदा वन्यजीवांचा मृत्यू होतो. आजही अशीच घटना घडली. गोंदियाकडून चंद्रपूरकडे लोकल ट्रेन जात होती. हिरडामाली-पिंडकेपार दरम्यान रेल्वे लाईन पार करीत असतांना २ हरीणांना लोकल ट्रेनने धडक दिली. या धडकेत दोन्ही हरीणांचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून दोन्ही मृतक हरीणांना गाडण्यात आले आहे. दरम्यान, पिंडकेपार-हिरडामाली रेल्वे मार्गावर रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला तारांचे कंपाउंड करण्याची मागणी अनेकदा वन्य प्रेमींनी व गावकऱ्यांनी केली आहे. कंपाउंड झाले की या रेल्वे मार्गावर कोणतेही वन्यप्राणी किंवा गायी येणार नाहीत व त्यांचा मृत्यू टाळेल. मात्र, याबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
हेही वाचा- नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही गोंदियात मुसळधार पाऊस, २४ तासात गारपीटीचे संकेत