गोंदिया - इंग्रजी माध्यम शाळेचे फॅड आता प्रत्येक आई-वडिलांसह मुलांनाही लागले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे विद्यार्थी, पालक नाक मुरडत आहेत. मात्र, देवरी शहरातील कापड व्यापारी मिथुन बंग यांनी त्यांच्या मुलीला खासगी शाळेतून काढून जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी पाठवले आहे. तिचा आज सातवा वाढदिवसही शाळेतच साजरा करण्यात आला. 'यावेळी लेक शिकवा, लेक जगवा'चा संदेश देत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
हेही वाचा- पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर
भूमी बंग असे विद्यार्थिनीचे नाव असून भागी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत ती शिक्षण घेत आहे. भूमी शाळेत हूशार आहे. तिला हिंदी, मराठी, इंग्रजी उर्दू भाषा लिहिता वाचता येतात. भूमीचे हस्ताक्षर देखील वळणदार असून दोन्ही हातांनी लिहिण्याची कला तिने अवगत केली आहे. तिचा आज सातवा वाढदिवस आहे. त्यामुळे तिचा वाढदिवस शाळेत साजरा करण्याचा निर्णय मिथून बंब यांनी घेतला. वाढदिवसाला भेट वस्तू स्वीकारल्या जातात. मात्र, भूमीने शाळेतील विद्यार्थांनाच भेट वस्तू दिल्या असून 'लेक शिकवा, लेक जगवा' अशा संदेशही दिला आहे.
भूमीला मोठे होऊन आयएएस बनायचे आहे. वाढदिवसादिवशी भूमीने आदर्श असलेल्या गोंदियाच्या महिला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद तसेच आई, बाबा, आजी-आजोबा यांचे फोटो वाढदिवसाच्या सोहळ्यात प्रदर्शित केले आहेत.