गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरोली येथे धान पिकाच्या तणसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ट्रॉलीतील तणसासह ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
सिरोली येथील एक शेतकरी शुक्रवारी दुपारी आपल्या शेतातून तणस भरलेला ट्रॅक्टर घरी नेत असताना गावातील विद्युत तारांचा स्पर्श ट्रॉलीतील तणसला झाला. त्यामुळे अचानक तणसाने पेट घेतला. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले यामुळे तणसासह ट्रॅक्टरलाही आग लागली व पूर्ण ट्रॅक्टर जळून खाक झाला. गावकऱ्यांनी आग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, आगीची तीव्रता आणि कडक उन्हामुळे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या उन्हाळी धान पिकाची कापणी व मळणीची कामे सुरू आहेत. धान पिकांची मळणी झाल्यानंतर मिळणारी तणस गुरांसाठी चारा म्हणून वापरली जाते. पावसामुळे तणस खराब होऊ नये म्हणून शेतकरी या तणसाचा साठा करून ठेवतात.