गोंदिया - चीनने तिबेट बळकावला, भारताची सीमा ओलांडून घुसखोरी करण्याच्या कुरापती सुरू आहेत. भारतीय सैन्यावर हल्ला केला. यामध्ये भारताचे वीर जवान हुतात्मा झाले. त्यामुळे चीनची मुस्कटदाबी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत प्रतापगडच्या नार्गेलिंग तिबेटीयन वसाहतीतील महिला-पुरुषांनी शुक्रवारी मुख्य मार्गाने लाँगमार्च काढला. हातात चीनचा निषेध करणारी फलके व उद्घोषणा करत तहसील कार्यालय गाठले.
चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून तेथील अर्थव्यवस्था खिळखिळी करा. चीनचे तिबेटीयन नागरिकांवर अन्याय, अत्याचार सुरू आहेत. अमानवीय कृती करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला धडा शिकवण्याची वेळ आता आल्याचे यावेळी तिबेटीयन नागरिकांनी सांगितले.
![boycott chines goods](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-11july20-tibetans-7204243_11072020174417_1107f_1594469657_44.jpg)
विशेष उल्लेखनीय म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा लाँगमार्च काढण्यात आला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना दोन मिनीटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तिबेट व भारताचे राष्ट्रगीत प्रस्तूत करण्यात आले. तिबेटीयनांच्या या भावना भारत सरकारला पाठवण्याचे आवाहन तिबेटीयन नागरिकांनी केले.
![boycott chines goods](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-11july20-tibetans-7204243_11072020174417_1107f_1594469657_283.jpg)