गोंदिया - मध्यप्रदेश सरकारच्या नो एन्ट्रीमुळे हजारो मजूर, गर्भवती महिला आणि आपल्या लहान मुलांसह गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर उपाशी आहेत. मात्र, अद्यापही मध्यप्रदेश सरकारने या मजूरांना मध्य प्रदेशमध्ये येण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नाही. त्यामुळे हे मंजूर आंदोलनाच्या पावित्र्यात असून, जर आता मध्यप्रदेश सरकारने त्यांना राज्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली नाही तर, विनापरवानगीने पायी पायीच प्रवेश करून महाराष्ट्राच्या सीमेवरून मध्यप्रदेशची सीमा सीमोल्लंघन करण्याचा इशारा या लोकांनी दिला आहे.
रोजगारासाठी मुंबई येथे गेलेले मजूर लॉकडाऊनमुळे आपल्या स्वगृही परतत आहेत. दरम्यान, मुंबईवरून पायीच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या गोंदिया जिल्ह्यातील रजेगाव येथील सीमेवर मागील तीन दिवसांपासून रोखून ठेवण्यात आले आहे. या मजुरांना मध्यप्रदेशात परतण्यासाठी तेथील सरकारने परवानगी दिली नसल्याने या हजारो मजुरांचा मागील तीन दिवसापासून येथेच मुक्काम आहे.
मुंबईवरून पायी निघालेल्या मजुरांसोबत त्यांचे कुटुंबीय असून, यात गर्भवती महिला आणि लहान बालकांचादेखील समावेश आहे. तब्बल दहा ते पंधरा दिवस पायी प्रवास करून व हाल सहन करून हे मजूर आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचले. सीमेवर पोहोचल्यावर आता आपण आपल्या राज्यात पोहोचू, असा आत्मविश्वास या मजुरांना होता. मात्र, मध्यप्रदेशच्या सरकारने त्यांना सीमेवर प्रवेश देण्यात नसल्याने त्यांचे चेहरे हिरमुसले आहेत. आपल्या राज्यात जाण्यासाठी मजुरासंह त्यांचे कुटुंबीय पोलिसांना याचना करीत आहेत. मात्र, नियमांमुळे महाराष्ट्र व मध्यप्रदेश पोलिसांनासुद्धा त्यांची मदत करता येत नाही.