गोंदिया - विदेशी बनून आलेल्या दोन व्यक्तींनी शहरातील बाजार पेठेत एमआय मोबाईलच्या दुकानदाराला तब्बल ३५ हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. त्यांनी दुकानामध्ये पॉवर बँक घ्यायचे असल्याचे सांगत हातसफाई केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दोन अनोळखी तरुण शिवम बावणकर यांच्या मालकीच्या एमआय मोबाईल स्टोअर्समध्ये पॉवर बँक विकत घेण्यासाठी आले. आम्ही विदेशातून आलो असल्याचे सांगत इंग्रजीमध्ये बोलले. तसेच विदेशी चलन दाखवून तुम्ही आम्हाला भारतीय चलनाचे नोट दाखवा, असे म्हटले. मात्र, त्यापैकी एकाने दुकान चालकास गोष्टीमध्ये गुंतवून दुकानदाराच्या पैशातील ३५ हजार रुपयांची रोख रक्कम हेराफेरी करून लंपास केली. मात्र, त्यावेळी दुकानदाराला आपले पैसे चोरीला गेल्याचे समजले नाही. मात्र, पैसे मोजल्यानंतर पैसे चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्या दोघांनीच चोरी केल्याचे दुकानादाराच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.