गोंदिया - तालुक्यातील छिपीया येथील ग्रामपंचायत भवनाची इमारत पुर्णपणे जीर्ण झाली असल्यामुळे इमारतीच्या छतामधून पाणी गळू लागले आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून येथील कर्मचारी आणि गावकऱ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. तसेच पावसाळ्यात या इमारतीला गळती लागलेली आहे. यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र, याची अद्यापही जनप्रतिनिधी किंवा शासनाने दखल न घेतल्याने गावकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
छिपीया येथील ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम २००४-०५ मध्ये करण्यात आले. या इमारतीच्या बांधकामाला १४ वर्षे झाली आहेत. तर अल्पावधीतच इमारतीचे स्लॅब कोसळू लागले आहे. इमारतीला पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधील महत्वपूर्ण रेकार्डसुध्दा खराब होत आहे. कर्मचाऱ्यांना इथे बसणेही कठीण झाले आहे.
तसेच गावकरी व शाळेतील विद्यार्थीही ग्रामपंचायतीमध्ये दाखले किंवा इतर कामासाठी येत असतात. मात्र, ही इमारत संपूर्ण जीर्ण झाली असल्याने कर्मचाऱ्यांच्या तसेच गावकरी लोकांच्याही जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी इमारतीचे बांधकाम करण्याची अनेकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पत्र देऊन मागणी केली. मात्र, त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे इमारतीचा धोका कायम आहे. तसेच इमारतीची त्वरीत दुरूस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.